वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस -14
फळ – आवळा
आमलक,आमलकी ,वयस्था, धात्री अश्या वेगवेगळ्या नावाने परिचित असलेले, अबाल- वृद्धांसाठी असलेले,जगामध्ये कुठल्या न कुठल्या स्वरूपात असलेले,आरोग्यदायी, अमृतासमान फळ म्हणजे आमलकी.
आयुर्वेदातील श्रेष्ठ आचार्य चरकाचार्य यांनी “आमलकी वयस्थापनानां श्रेष्ठ:” पर्यायाने शरीराची झीज न होता चिरकाल तारुण्य प्राप्त करण्यासाठी उपयोगी फळ अर्थात आवळा.
आयुर्वेदाबरोबर आवळ्याचे धार्मिक महत्व आहे.तुळशीच्या लग्नात पूजेसाठी आवळा लागतो. आमलकी एकादशी म्हणून स्वतंत्र एकादशी आहे.आवळी भोजनाची प्रथा आहे.
आवळ्यामधे लवण म्हणजे खारट सोडून तुरट ,आंबट,गोड ,तिखट ,कडू अश्या पाचही चवी असतात.
शरीरावर थंड परिणाम करणारे आवळ्याचे फळ आहे.
आवळा हे Vitamin C चे अतिशय महत्वाचे स्त्रोत आहे.
शरीरातील रस,रक्त मांस मेद मज्जा आणि शुक्र धातू यांवरती आवळ्याचे कार्य आहे.
आवळा शरीराला योग्य मात्रेत वजन प्राप्त करून देऊन Fighting Fit बनवतो. केसांसाठी ,डोळ्यांसाठी ,त्वचेसाठी आवळा अतिशय उत्तम आहे.
आवळ्याचा च्यवनप्राश, मोरावळा ,आवळा कँडी ,आवळा सुपारी ,आवळ्याचा चहा,आवळ्याचे सरबत, आवळ्याचे तेल , आमलकी घृत अशा अनेक स्वरूपांमध्ये आवळा उपयोगी आहे.
प्राय: आवळा शरद ऋतू म्हणजेच दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नानंतर सेवन करणे हितावह असते कारण यानंतर आवळा पक्व होतो.
जंगलामध्ये असणारा आवळा आणि शेतामध्ये पाणी देऊन वाढवलेला आवळा यांच्या गुणांमधे खूप फरक असतो .ज्यांना शक्य त्यांनी जंगलातील आवळा घ्यावा.
काळजी:
ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे ,त्यांनी आवळा सुपारी घेऊ नये.




