वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस -13
फळ – कोहळा ( कुष्मांड)
“कुष्मांड वल्लीफलोत्तमा”
आयुर्वेदानुसार कुष्मांड म्हणजेच कोहळा हे वेलींवर येणाऱ्या फळांपैकी सर्वात उत्तम आहे.
कुष्मांड शब्दातला उष्म शब्दाचा अर्थ आहे उष्णता. अंड म्हणजे बीज. ज्याच्या बीजामध्ये अजिबात उष्णता नाही तो कुष्मांड. त्यामुळे कोहळा शरीरातील उष्णता कमी करतो. याशिवाय अनेक मानसिक रोगांवरही कोहळा हे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे खूप ताण असणाऱ्यांसाठी कोहळा हे एक उत्तम आहारद्रव्य आहे.
वाग्भट आचार्यांनी कोहळ्याला रसायन संबोधले आहे.
कोहळ्याचे फळ लहान भोपळ्याएवढे असते. काही कोहळे हात दीड हात लांब असतात. चांगली जमीन असल्यास एका वेला पासुन 50-60 देखील कोहळे येतात. कोहळ्याचा पाक होतो, तो पौष्टिक असतो. याची भाजी व सांडगे केले जातात.
कोवळा कोहळा – अति थंड, शरीरातील आग, उष्णता कमी करणारा आहे.
पिकलेला कोहळा – किंचित थंड, भुक वाढवणारा, चवीला गोड खारट, पथ्य असा आहे.
कोहळ्याचे गुण
• कोहळा बुद्धी साठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे स्मरण शक्ती वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग आहे.
•कोहळा केसांसाठी उत्तम आहे.ज्यांना आपले केस काळे ,लांब हवेत अश्यांनि कोहळयाची भाजी,कोशिंबीर,पाक या स्वरूपात कोहळा घ्यावा.
•मधुमेह असलेल्यांनी हात पायांची आग असल्यास कोहळयाचा रस हाता पायांना लावावा.
•अनेक वर्षापासून कॉम्प्युटर,लॅपटॉप वर काम करणाऱ्यांनी,ज्यांना DRY EYE SYNDROME आहे अश्यांनी कोहळ्याचा रस घ्यावा व कापसाच्या पट्ट्या कोहळ्याच्या रसात बुडवून डोळ्यांवर ठेवाव्या.
•अनेक दिवस कष्टाचे काम केल्यामुळे व वजन उचलण्याची सवय असल्यामुळे उर:क्षत म्हणजेच राजयक्ष्मा किंवा Tuberculosis चा एक प्रकार ज्यात वजन कमी होणे,सारखा खोकला असणे ,भूक कमी लागणे, थुंकीतून रक्त येणे,असे असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने कोहळ्यापासून तयार होणारा प्राश हा नक्की सेवन करावा.
•कोहळा रेषायुक्त असल्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या समस्या दूर होतात.
•कोहळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवते व मूत्रपिंडाची शुद्धी करते . त्यामुळे मुतखडा, मुत्रासंबंधी रोगांमध्ये याचा उपयोग होतो.
• कोहळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तहान अधिक लागणे, तोंड कोरडे पडणे अशावेळी कोहळ्याचा ज्युस घ्यावा.
• कोहळा मांस धातु वाढवून वजन वाढण्यास उपयोगी आहे.
• कोहळा शरीरातील थकवा दूर करून शक्ती वाढवणारा आहे.
• कोहळा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.
•कोहळ्याच्या बियांची पावडर 1 कप दुधातून घेतल्याने शरीराचे पोषण व शक्ती वाढवणारे आहे.
•कोहळा नक्की कधी खावा?
ऑक्टोबर हीट म्हणजेच साधारण आश्विन महिना .या महिन्यात सगळ्यांनीच कोहळा वापरावा.
कोहळ्यापासुन कोहळा पाक ,वड्या , कोहळ्याचे भाजितले वडे,पापड ,कोहळा प्राश अश्या अनेक गोष्टी तयार केल्या जातात. कोहळ्याचा पेठा हाही उपयुक्त आहे.



