वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस -10
फळ-नारळ
नारळाचे झाड हे प्रामुख्याने समुद्रकिनारी किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी वाढते .परंतु नारळ आता सगळीकडे लावले जातात.
नारळाच्या झाडाला “कल्पवृक्ष” असे देखील संबोधले जाते कारण यापासून मिळणारी एकही गोष्ट वाया जात नाही . नारळाचे पाणी, नारळातील मलई, ओले नारळ, सुके नारळ, नारळाचे तेल, नारळाची करवंटी असे सगळे उपयोगी असते.
बुद्धीची देवता श्री गणेश आहेत व गणेशास पंचखाद्य प्रिय असते. पंच खाद्य मध्ये खोबरे, खारीक, खिस्मिस, खडीसाखर व खसखस असते.
उकडीच्या मोदकामध्ये ओल्या नारळाचा कीस , गुळ असतो , बुध्दी साठी उपयुकत आहे. शरीराचे बल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे
ओल्या नारळाचे फायदे
•नारळपाणी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक पेय आहे. यामध्ये अनेक पोषकमूल्ये असतात जे कोणत्याही प्रक्रिया किंवा रसायनांशिवाय आपल्याला मिळतात.
• हे सौम्य, पचायला हलके पेय आहे व ते पाण्याची कमतरता,तहान कमी करते, थकवा दूर करते. नारळपाणी हे ऊर्जा व बल प्रदान करते.
• नारळाचे पाणी हे स्निग्ध, चवीला गोड असून ते शरीरातील वात व आग कमी करते तसेच अम्लपित्त ,आतड्यांमधील व्रण, छातीतील व पोटातील जळजळ हा त्रास कमी करते.
•नारळपाणी हे उत्तम मुत्रल असल्याने मुत्राचे प्रमाण वाढवून शरीरशुध्दीचे कार्य करते. तसेच मूत्राशयातील पेशींना बळ मिळवून देते.
•नारळ केसांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे केसांना पोषण मिळते तसेच त्वचेसाठी देखील हे हितकर असल्याने त्वचेला तेजस्वी करते व त्वचेचा कोरडेपणा कमी करते.
•ओल्या नारळाच्या दुधापासून सोलकढी तयार करतात जी पाचक, मूत्रल व तृप्तीकर आहे
सुके नारळ / खोबऱ्याचे फायदे
सुक्या नारळाचा उपयोग पाककृतीसाठी, धार्मिक कार्यासाठी तसेच अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये केला जातो.
• सुके खोबरे शरीराला बळकटी देते.
• सुक्या खोबऱ्यामध्ये फोस्फरस असल्याने ते हाडांना मजबूत करते.
•सुक्या खोबऱ्यापासुन बनवल्या जाणाऱ्या तेलाचा उपयोग खाण्यामध्ये तसेच केस व त्वचा यांवर लावण्याकरीता वापरतात.

नारळपाणी कोणी घ्यावे ?
•ज्या वेळेस शरीरातून पाणी बाहेर जाते उदाहरणार्थ उलटी, हगवन, अशा वेळेस नारळाचे पाणी नक्की घ्यावे.
•उन्हाळया सारखे दिवस जेव्हा घरी बसुनसुद्धा ज्येष्ठ नागरीकांना dehydration होत असते त्यांनी नारळपाणी घ्यावे .
•नारळपाणी हे मांस व बल वाढवणारे आहे म्हणुनच नित्य व्यायाम करणारे याची मलाई घेऊ शकतात.
•नारळाचे पाणी लिंबू रस मिसळून घ्यावे.
नारळपाणी कोणी घेऊ नये
•नारळपाणी हे शीत असल्याने ज्यांना सतत सर्दी-खोकला होतो त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार ते घ्यावे.
•आत्ताच्या काळात ज्या महिला गर्भवती आहेत त्या नित्यनियमाने नारळपाणी घेतात पण त्यांच्या बाळाला पुढे चालुन सर्दीचा त्रास होऊ शकतो .•नित्य नारळाचे पाणी घेतल्याने किडनीवरती भार येऊ शकतो.
•तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी हे ठरावीक प्रमाणात घ्यावे कारण त्यांनी नियमित नारळपाणी घेतल्यास त्यांची साखर वाढु शकते.
•सुके नारळ हे पचण्यास जड
असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो म्हणून ते अतिप्रमाणात घेऊ नये.
•विशेषतः हृदयाचे आजार , उच्च रक्तदाब व cholesterol वाढलेले असेल अश्यांनी याचे अतिसेवन टाळावे.



