वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस -15
फळ – डाळिंब
दाडीम, डाळिंब अश्या नावांनी सुपरिचित असलेले हे फळ. लहान मुलांपासून – ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना विशेष उपयोगी आहे.
शरद ऋतु म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि ग्रीष्म ऋतु म्हणजे एप्रिल-मे या कालावधीमध्ये डाळिंबाचा विशेष उपयोग आाहे.आजकाल वर्षभर डाळींब उपलब्ध होतात.
व्यवहारात डाळिंबाच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या दाण्याची मस्कती डाळिंबे व ‘बेदाणा’ जातीची काबुली.
डाळींब चवीला किंचित आंबट, किंचित तुरट-आंबट, किंचित गोड असे असतात.
डाळिंबाचे दाणे, डाळिंबाचा रस दोन्हीही उपयोगी असतात.डाळींबाचे दाणे आहारामधे कोशिंबीर ,पुलाव, याच्यामध्येही वापरू शकतो किंवा नुसतेही आपण खाऊ शकतो.
उन्हाळ्यामध्ये बाल आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिक यांना अस्वस्थपणा, थकवा, झोप न येणे अशांसाठी डाळींबाचा रस त्यात थोडी खडीसाखर, थोडे जिऱ्याची पूड चिमुटभर मीठ असे घेण्यास हरकत नाही.
डाळींबाचा रस घेत असताना सलग 4-5 दिवस घ्यावा मध्ये 2-3 दिवस gap पुन्हा 4-5 दिवस घ्यावा असे करू शकतो.
डाळींब हे उत्तम पित्तशामक आहे. शरीरातील दाह, आग उष्णता कमी करणारे आहे. नेहमी नेहमी तोंड येणे अश्यां साठी डाळींबाचा रस किमान 5 दिवस घ्या.
कॅन्सर रुग्णांमध्ये Chemotherapy, Radiations यामुळे तोंडाला चव नसणे ,मळमळ झाल्यासारखी वाटणे ,काही खाण्याची इच्छा न होणे,थकवा त्याचबरोबर जीभेचा कॅन्सर , अन्ननलिकेचा कॅन्सर अश्यांमधे डाळिंबाचा रस खूप उपयोगी ठरतो .
त्वचा ,केस ,डोळे यासाठी डाळींब अतिशय उपयोगी आहे.
डाळींबाचे दाणे ,डाळिंबाच्या फळाची साल , डाळिंबाच्या झाडाची साल ,डाळींबाची पाने असे सर्व तज्ञांच्या सल्ल्याने उपयोगी होऊ शकते.
तापामध्ये, तापानंतरच्या थकव्यामध्ये डाळिंबाचे दाणे खाल्याने उत्साह वाढतो.
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, वावडिंग आणि डाळिंबाची साल उकळून त्याचा काढा करून द्यावा.
जुनाट पित्त, जळजळ यासाठी डाळिंबापासून बनविलेले ‘दाडीमादी घृत’ नावाचे औषध उत्तम कार्य करते. घृत म्हणजे तूप! याचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
डाळींबापासून दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्यतेल, दाडिमाष्टक चूर्ण, दाडिमादिघृत, दाडिमावलेह ही आयुर्वेदिक औषधे बनविली जातात.



